६ कोटींच्या बिझनेससाठी नवरा, मुलगा अन् पुतण्याला विष! १२ वर्षांच्या मुलीने केला पर्दाफाश!
६ कोटींच्या बिझनेससाठी महिलेने रचला भयानक कट! स्वतःच्याच नवऱ्याला, १६ वर्षांच्या मुलाला आणि पुतण्याला जेवणातून तब्बल वर्षभर विष दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हे विष एकाच वेळी न देता थोडं थोडं शिसं अन्नातून दिलं जात होतं. अखेर एका चिमुरडीने दिलेल्या माहितीमुळे या संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला.
रेणू असं या ४२ वर्षीय महिलेचं नाव असून, तिचा पती सुशील कुमार भटनागर यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल ६ कोटी रुपये आहे.
गेल्या वर्षभरात सुशील, त्यांचा मुलगा वंश आणि पुतण्या देव भटनागर यांची प्रकृती वारंवार बिघडली. वैद्यकीय तपासणीत तिघांच्याही शरीरात मोठ्या प्रमाणात शिसं आढळलं. त्यानंतर सुशील यांना संशय आला.
दरम्यान, सुशील यांच्या १२ वर्षांच्या मुलीने एक धक्कादायक माहिती दिली. आई दोघींसाठी वेगळं जेवण ठेवते आणि बाकीच्या कुटुंबीयांच्या जेवणावर विशिष्ट स्प्रे मारते, असं तिने सांगितलं.
तपासात रेणूने पतीचा व्यवसाय ताब्यात मिळवण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप समोर आला. पतीच्या दोन कोटींच्या विम्यातही तिचं नाव नॉमिनी म्हणून होतं. अखेर २३ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील बहिणीच्या घरातून पोलिसांनी रेणूला अटक केली. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.





