बारामतीत खळबळ! घराचा दरवाजा आतून बंद अन् माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू; गळ्यावर व्रणामुळे गूढ वाढलं
बारामतीतून एक धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. तांदुळवाडी येथील दादा पाटीलनगर परिसरात घराचा दरवाजा आतून बंद असताना माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
रमा विजय गावडे, वय ४१, आणि त्यांचा १७ वर्षीय मुलगा विवेक गावडे अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रमा यांचे पती विजय गावडे हे २० ऑगस्टच्या रात्री कंपनीत नाईट शिफ्टला गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले.
आवाज देऊनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी एका खोलीत विवेक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर त्याच खोलीत खिडकीजवळ रमा गावडे बेशुद्ध अवस्थेत आढळल्या.
रमा यांच्या गळ्यावर काळसर व्रण आढळल्याने या घटनेबाबत संशय अधिक वाढला आहे.
दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. माय-लेकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा आत्महत्येचा प्रकार आहे की यामागे आणखी काही गूढ आहे? याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.
बारामती तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, शवविच्छेदन आणि तपासातील पुराव्यांनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.





