छोले-भटुऱ्यात स्टेपलरची पिन? वाशीतील कॅफेवर गंभीर आरोप
धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील एका कॅफेमध्ये ग्राहकांच्या सुरक्षिततेशी खेळ झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. छोले-भटुरेमध्ये स्टेपलरची पिन आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी वाशी येथील ‘कॅफे दासजी’ येथे छोले-भटुरे खात असताना एका ग्राहकाला भटुऱ्यामध्ये स्टेपलरची पिन आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासोबतच, कॅफेमध्ये अस्वच्छता असून पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
सुदैवाने हा प्रकार वेळेत लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. संबंधित ग्राहकाकडे या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाने तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या आरोपांबाबत संबंधित कॅफे व्यवस्थापनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही





