गुरुवारी शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर भव्य जनआक्रोश मोर्चा – प्रमोद नाना भानगिरे
शिक्षण मंडळासमोर ठिय्या आंदोलन; विविध गंभीर प्रशासकीय प्रश्नांवर महापालिका प्रशासनाला धारेवर धरणार
पुणे महानगरपालिकेचा ढासळलेला प्रशासकीय कारभार, निकृष्ट दर्जाची विकासकामे, घनकचरा व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी, निविदा प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न, शिक्षण मंडळातील महत्त्वाची फाईल गायब होण्याची घटना, महापालिकेच्या मालकीचे एलईडी प्रकाशदिवे चोरीस जाण्याचा प्रकार, दूषित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पावसाळ्यात जलमय होणारे रस्ते, पीएमपीएमएलमधील पदोन्नती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेले गंभीर प्रश्न तसेच घनकचरा विभागातील आठ ते दहा वर्षे सेवा बजावलेल्या सुमारे १५० कंत्राटी कामगारांना अचानक सेवेतून कमी करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना पुणे शहराच्या वतीने गुरुवार, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर दुपारी ४.०० वाजता पुणे महानगरपालिका आवारातील शिक्षण मंडळ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून, शिक्षण मंडळातील महत्त्वाची फाईल गायब होण्याच्या घटनेबाबत संबंधित प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्तांना विविध प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करून तातडीने ठोस भूमिका घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.
शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, “पुणेकरांकडून कराच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा महसूल जमा होत असताना नागरिकांना निकृष्ट दर्जाची विकासकामे, दूषित पिण्याचे पाणी, अस्वच्छता, खचणारे रस्ते, निष्क्रिय प्रशासन आणि उत्तरदायित्वाचा अभाव याशिवाय काहीच मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. घनकचरा व्यवस्थापनातील प्रश्न, निविदा प्रक्रियेबाबत निर्माण झालेला संशय, शिक्षण मंडळातील फाईल गायब होणे, एलईडी प्रकाशदिव्यांची चोरी, पीएमपीएमएलमधील पदोन्नती प्रक्रियेबाबत उपस्थित झालेले प्रश्न आणि अनेक वर्षे सेवा बजावलेल्या कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून कमी करणे या घटना स्वतंत्र नसून प्रशासनातील गंभीर त्रुटी अधोरेखित करणाऱ्या आहेत. या सर्व प्रश्नांवर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घेऊन पारदर्शक, उत्तरदायी आणि परिणामकारक कार्यवाही करावी. अन्यथा शिवसेना पुणेकरांच्या न्याय्य हक्कांसाठी अधिक तीव्र लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारेल.”
या जनआक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलनात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना पुणे शहराच्या वतीने करण्यात आले आहे.





