पुण्याची वाहतूक बदलणार! HCMTR 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचसीएमटीआर प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासोबतच प्रस्तावित ‘पाताळलोक’ बोगदा प्रकल्पाचे तज्ज्ञांकडून सर्वेक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी एचसीएमटीआर, पीएमआरडीए रिंगरोड आणि पाच बोगद्यांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला.
४३.६० किलोमीटर लांबीच्या एचसीएमटीआर प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक २५ ते ३० टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच सर्व मेट्रो मार्गिका एकमेकांशी जोडल्या जाणार असून शहरातील रस्ते वाहतूक अधिक सक्षम होणार आहे.
‘पाताळलोक’ प्रकल्पाअंतर्गत भोसरी-उंड्री-पुरंदर विमानतळ, रामनदी-भूगाव-राजाराम पूल आणि तळजाई-पद्मावती-हिंगणे या तीन मार्गांवर बोगद्यांचे सर्वेक्षण तज्ज्ञ संस्थांकडून करण्यात येणार आहे.
प्रकल्पासाठी सरकारी जागा महापालिकेला मोफत हस्तांतरित करून कामाला गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.





