मांजरी साई सृष्टी कॉलनीच्या आंदोलनाला मोठं यश! मयूर खलसे यांच्या लढ्याचा विजय

Rokhthok Maharashtra 4 0

मांजरीतील साई सृष्टी कॉलनी येथील नागरिकांच्या दीर्घकालीन लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. ड्रेनेज लाईनसह विविध नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी माजी शासन नियुक्त नगरसेवक मयूर खलसे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे.
या आंदोलनादरम्यान नागरिकांनी ड्रेनेज लाईन, रस्ते आणि इतर स्थानिक विकासकामांच्या मागण्या केल्या होत्या. या मागण्यांवर 6 ऑगस्ट रोजी पुणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीकडून साई सृष्टी कॉलनीतील विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना देण्यात आली.
प्रशासनाचे मंजुरीचे आदेश आंदोलनस्थळी येऊन देण्यात आल्यानंतर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी मयूर खलसे यांचा हार घालून सत्कार केला आणि जल्लोष साजरा केला.
अनेक दिवसांच्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्याने बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. या निर्णयामुळे साई सृष्टी कॉलनीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांच्या निराकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. मात्र आता विकासकामांना मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.