डोंगराचे लचके तोडून, माती-रेती-खडी चोरून सरकारचे पैसे बडविणारया खाणमाफियांवर ‘नजर’| राज्य सरकारचे ‘महाखनिज-२’ नवे पोर्टल; रूबल अग्रवाल यांच्यावर मोठी जबाबदारी

Rokhthok Maharashtra 6 0

राज्य सरकार आणि महसूल खात्याला चक्क फसवून चोरट्या मार्गाने डोंगर पोखरून वाटेल तेव्हा वाटेल तेवढी माती, मुरूम, खडी अर्थात, बेकायदा गौण खनिज उपसणाऱ्या माफियांना ‘ट्रॅक’ करून त्यांना अद्दल घडवण्यासाठी फडणवीस सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. गौण खनिज माफिया आणि त्यांच्या यंत्रणेवर २४ तास लक्ष ठेवून, कोठून, किती आणि कसे गौण खनिज काढले जाते; परवाना, प्रत्यक्ष उपसा, त्यांचे नेमके शुल्क (रॉयल्टी) किती, यावर नजर ठेवून दंड वसूल करण्यासाठी खास ‘महाखनिज-२’ या पोर्टलची उभारणी केली असून, त्यावर गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांची कुंडली राहणार आहे. परिणामी, सरकारचा महसूल बुडविणाऱ्यांपासून नैसर्गिक संपत्तीचे लचके तोडणाऱ्यांचा बंदोबस्त होऊ शकतो.
दुसरीकडे, बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या योजना नावापुरत्याच राहिल्याने आता महसूल खात्याने खोदाई ठिकाणी कॅमेऱ्यांपासून पोलिस, ट्रॅकिंग यंत्रणा राहणार आहे. त्यामुळे गौण खनिज चोरांना चाप लागून, सरकारी तिजोरीतील महसुलात भर पडणार आहे.

राज्यभरात बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून नवनव्या योजना पुढे आल्या मात्र; आजवर त्या कागदोपत्रीच राहिल्या. त्याचाच फायदा उठवून या क्षेत्रातील व्यावसायिकांनी स्वत:चे खिसे भरण्यासाठी सरकारचा महसूल बुडविला. काही सरकार यंत्रणेची नजर चुकवून तर; अनेक वेळ सरकारच्याच यंत्रणेचे अभय मिळवून गौण खनिज उपसत राहिले. या उत्खननासाठी जिल्हा प्रशासनाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आदेश निघाले; परंतु, कोणतीही परवानगी न घेता थेट उत्खनन केले जात असल्याचे उघड झाले. परवान्यापेक्षा अधिक उत्खनन करून सरकारचा महसूल बुडविल्याचे उघड झाले. त्यामुळेच बेकायदा गौण खनिजाचा मुद्दा चर्चेत आला. यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करण्याची मोहीम राबवूनही बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर नियंत्रण राहत नव्हते. या पार्श्वभूमीवर, ‘महाखनिज २’ ही यंत्रणा उभारण्यात येत असून, नवी मुंबईतील कोकण भवनात तिचा नियंत्रण कक्ष असणार आहे. तेथून राज्यातील सर्व भागांत लक्ष ठेवले जाणार असून, या यंत्रणेशी सर्व महसूल विभाग जोडले आहे.

कोट
‘‘गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन करून सरकारची दिशाभूल करणाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. अशा प्रकरणांमधील दोषींना कोणीही पाठीशी घालणार नाही आणि दंड आकारताना कोणतीही हायगय केली जाणार नाही, याकडे अधिक लक्ष दिले जाईल. प्रसंगी या लोकांचा काळ्या यादीत टाकू.’’

– रूबल अग्रवाल,
विभागीय आयुक्त, कोकण विभाग,
नोडल ऑफिसर, महाखनिज-२ पोर्टल

चौकट १
‘आयएएस’ रूबल अग्रवाल माफियांना धडा शिकवणार!

बेकायदा गौण गौण खनिज उत्खननाचे परिणाम पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘पोर्टल’च्या माध्यमातून गौण खजिन चोरांवर ‘वॉच’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभर या साऱ्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी फडणवीस यांच्या विश्वासू ‘आयएएस’ आणि कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांच्याकडे राज्याचे ‘नोडल ऑफिसर’ म्हणून नवी जबाबदारी सोपवली आहे. या योजनेचे उद्घाटन पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

चौकट २
चौकट २
‘महाखनिज-२’ची अशी असेल नवी यंत्रणा?
Mahakhanij 2.0 : ठळक मुद्दे

-२४x७ खाणकामावर डिजिटल नजर
-१०० टक्के डिजिटल वाहतूक परवाना
-खनिज वाहतुकीचे जीपीएस ट्रॅकिंग
-ड्रोन-लिडारने खाणींचे सर्वेक्षण
-AIद्वारे अवैध उत्खननाला आळा
-ई-पंचनामा व डिजिटल जप्ती
-दंड वसुली प्रक्रिया स्वयंचलित
-जीआयएस आधारित एकत्रित डॅशबोर्ड

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.