कुपवाडमध्ये धक्कादायक हत्याकांड; आरोपी 2 तासांत जेरबंद
सांगलीच्या कुपवाड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेचा खून, तर तिचा पती गंभीर जखमी झाल्याची घटना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडली.
कुपवाड येथील शांती कॉलनी, चाणक्य चौकाजवळ रस्त्यावर कचरा टाकण्याच्या कारणावरून आरोपीने महिलेला जाब विचारला. त्यानंतर वाद वाढला आणि आरोपी फरीद अब्दुल शेख याने घरातून हातोडा आणि चाकू आणल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात मोहन् केसेकर यांच्या डोक्यात हातोड्याने मारण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांची पत्नी मनिषा मोहन् केसेकर यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मनिषा केसेकर यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवघ्या दोन तासांत वॉलचेसवाडी येथे फरीद अब्दुल शेख याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कुपवाड पोलीस करत आहेत. किरकोळ वादातून झालेल्या या हिंसक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.





