धीरज परदेशी हत्येचा मोठा खुलासा! ‘त्या’ जुन्या वादातून कट रचला; मुख्य आरोपीने पोलिसांसमोर उलगडला प्लॅन
अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग रजपूत उर्फ परदेशी यांच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.
धीरज परदेशी यांची हत्या भगवा टिळा लावल्यामुळे झाल्याचा आरोप झाल्यानंतर या घटनेला धार्मिक वळण मिळालं होतं. मात्र, पोलिसांच्या तपासात हत्येमागचं वेगळंच कारण समोर आलं आहे.
पोलिसांच्या रिमांड रिपोर्टनुसार, बकरी ईदच्या एक दिवस आधी दुचाकीचा जोरात हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून धीरज आणि काही जणांनी मुख्य आरोपी मुस्तकिम सय्यद याला मारहाण केली होती. या जुन्या वादातूनच धीरजचा काटा काढण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा आहे.
७ ऑगस्टला मुस्तकिमला त्याचा नातेवाईक सिराज याने फोन करून धीरज दर्गादायरा कब्रस्तान परिसरात असल्याचं सांगितलं. त्यानंतर आरोपी एकत्र जमले आणि धीरजला कुठे आणि कशा पद्धतीने मारायचं, याचा कट रचल्याचं तपासात समोर आलं.
धीरज काम करत असताना आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. हत्येसाठी वापरलेले दांडके लपवण्यात आले, कपडे बदलण्यात आले आणि त्यानंतर काही आरोपी संभाजीनगरमार्गे रेल्वेने सिकंदराबादला पळून गेल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपी निष्पन्न झाले असून १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
म्हणजेच, धीरज परदेशी हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा आरोप झाला असला, तरी पोलिसांच्या तपासानुसार हत्येमागे जुन्या वादाचा बदला हे प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे.





