सातारा जिल्ह्यात रिक्षाचालकांना ड्रेस कोड बंधनकारक! एसपी निखिल पिंगळे यांच्या सूचनेनंतर वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर!
सातारा जिल्ह्यात रिक्षाचालकांसाठी आता शिस्त आणि नियमपालनावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.रिक्षाचालकांनी ठराविक ड्रेस कोडमध्येच रिक्षा चालवावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या असून, नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था मिळावी, हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

रिक्षा ही सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची ओळख स्पष्ट असणे, चालकांनी शिस्तबद्ध पोशाखात असणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे यावर प्रशासनाचा भर आहे.आजपासून वाहतूक पोलिसांकडून रिक्षांची तपासणी अधिक कडक होण्याची शक्यता आहे. रिक्षाचालकांचा ड्रेस कोड, आवश्यक कागदपत्रे, वाहनाची स्थिती आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.

रिक्षाचालकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, ठरवून दिलेला ड्रेस कोड वापरावा आणि प्रवाशांशी सभ्य वर्तन ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.दरम्यान, ही कारवाई केवळ दंडात्मक न राहता रिक्षा व्यवसायात शिस्त, पारदर्शकता आणि प्रवाशांचा विश्वास वाढवण्यासाठी कितपत प्रभावी ठरते, याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यातील रिक्षाचालकांसाठी पोलिस प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे वाहतूक व्यवस्थेत शिस्त येणार का?
आणि नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर आता किती कडक कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सातारा जिल्हा-प्रतिनीधी





