पुण्यात सासूवर कोयत्याने हल्ला! जावयाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल
पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी करून जावयाला विचारणा करणाऱ्या सासूवर जावयाने थेट कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात सासूच्या डोक्यावर आणि हातावर दुखापत झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील संजय गांधीनगर परिसरात १५ सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संजय त्रिंबक रगडे, वय ३५, याचे पत्नीशी गेल्या काही दिवसांपासून वारंवार वाद होत होते. मंगळवारी दुपारी दोघांमध्ये भांडण सुरू असताना सासूने मध्यस्थी केली आणि जावयाला भांडणाबाबत विचारणा केली.
सासूने विचारणा केल्याने संजय रगडे संतापला आणि तो स्वयंपाकघरातून धारदार कोयता घेऊन आला. त्यानंतर सासूच्या डोक्यावर आणि हातावर वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी एका २४ वर्षीय प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संजय रगडे याच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ल्याचे नेमके कारण आणि घटनेतील इतर तपशीलांचा पोलीस अधिक तपास करत आहेत.





