खंडीत वीजपुरवठयामुळे फुरसुंगी-उरुळीकर त्रस्त
फुरसुंगी व उरुळी देवाची परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिवसातून अनेकदा वीज जाण्याच्या प्रकारामुळे घरगुती ग्राहकांसह दुकानदार, विद्यार्थी व लघुउद्योजकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कधी केबल डॅमेज, कधी फुरसुंगी सबस्टेशनमधील जंप तुटणे, तर कधी भैरवनाथ फिडरमध्ये बिघाड अशी वेगवेगळी कारणे महावितरणकडून सांगितली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या खोदाईदरम्यान केबल तुटणे, कावळा तारांना चिकटणे किंवा डीपीवर साप चढणे अशी कारणेही नागरिकांना ऐकावी लागत असल्याची चर्चा आहे.
वीज गेल्यानंतर “अर्धा ते एक तास लागेल”, “जंप जोडण्याचे काम सुरू आहे”, “फिडरमध्ये प्रॉब्लेम आहे” अशी उत्तरे मिळत असल्याचे नागरिक सांगतात. मात्र, अनेकदा तासन्तास वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.
वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे विद्युत उपकरणे, व्यवसाय आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरातील वीज यंत्रणेची तातडीने तपासणी करून वारंवार होणारे बिघाड कायमस्वरूपी दूर करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रोखठोक न्यूज फुरसुंगी प्रतिनिधी :- गणेश भागीवंत





