“केस मार्गी लावतो” म्हणत PSI घरात गेला; 28 वर्षीय महिलेचा गंभीर आरोप, बीडमध्ये गुन्हा दाखल
बीडच्या वडवणी शहरातून पोलीस दलाला हादरवणारी घटना समोर आली आहे. तक्रारदार महिलेची केस मार्गी लावण्याचे आमिष दाखवून एका PSI ने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणाच्या अनुषंगाने वडवणी पोलीस ठाण्यातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड यांनी तिच्याशी संपर्क साधला आणि “तुझं काम करून देतो” असे सांगितल्याचा आरोप आहे.
त्यानंतर शुक्रवारी रात्री ते पीडितेच्या घरी गेले. तिथे महिलेने विरोध केला असतानाही धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केली आहे.
घटनेनंतर महिलेने ११२ क्रमांकावर संपर्क साधला. मात्र तक्रार नोंदवून घेण्यात सुरुवातीला टाळाटाळ झाल्याचा आरोप तिने केला. त्यानंतर तिने थेट बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी संपर्क साधला.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानंतर संबंधित PSI विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार आहे.





