कराडमध्ये संशयित दुचाकी चोरांच्या टोळीला तडीपारचा दणका; सातारा, सांगली जिल्ह्यात प्रवेशबंदी!
कराड शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
कराड शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या टोळीतील तिघांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या संशयितांना दणका देत सातारा आणि सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.
या कारवाईत जय संजय जाधव, वय १९ वर्षे, प्रथमेश दत्तात्रय गवते, वय २९ वर्षे आणि ओम दत्तात्रय गवते, वय १९ वर्षे, सर्व राहणार रविवार पेठ, कराड, यांचा समावेश आहे.
या संशयितांविरोधात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोटारसायकल चोरीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या कारवाईमुळे दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होणार असून, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.





