कराडमध्ये निर्माल्य संकलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; २० टन निर्माल्य आणि ६०० किलो प्लास्टिक जमा
कराडमध्ये निर्माल्य संकलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; २० टन निर्माल्य आणि ६०० किलो प्लास्टिक जमा
कराडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी अवनी संस्थेच्या पुढाकाराने निर्माल्य संकलनाची विशेष मोहीम राबविण्यात आली.
“निर्माल्य नदीत टाकू नका, तर खतनिर्मितीसाठी वापरावे” या संदेशातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यात आली.
अवनी संस्थेच्या कचरा वेचक महिलांनी या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या पुढाकारातून यंदा अंदाजे २० टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले. तसेच निर्माल्य वर्गीकरणातून सुमारे ६०० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले.
संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीसाठी प्रक्रिया करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात निर्माण होणाऱ्या निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच प्लास्टिक कचऱ्याचे संकलन आणि वर्गीकरण करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
दरम्यान, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी कराड नगरपरिषदेकडून गणेशमूर्ती विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे नदी प्रदूषण रोखण्यास मदत होत आहे.
अवनी संस्थेच्या वतीने यंदाही निर्माल्य वर्गीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.





