सातारा जिल्ह्यात ‘गन कल्चर’चा वाढता धोका; दिड वर्षांत ११२ पिस्तूल पोलिसांकडून हस्तगत
सातारा : शांत, सुशिक्षित आणि पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यात आता अवैध शस्त्रांच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील विविध भागांत पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि इतर शस्त्रांची तब्बल ११२ प्रकरणे उघडकीस आली आहेत.
या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यात ‘गन कल्चर’ रुजत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पिस्तूल बाळगण्यामागे प्रत्येक प्रकरणात वेगवेगळी कारणे समोर येत असली, तरी पोलिसांच्या कारवाईतून अवैध शस्त्रांचा वापर आणि त्यांची उपलब्धता हा गंभीर मुद्दा असल्याचे दिसून येत आहे.
पिस्तूल बाळगण्यामागे वाद, दहशत निर्माण करणे, तसेच अवैध शस्त्रांच्या व्यवसायासारखी विविध कारणे असल्याचे समोर येते. विशेष म्हणजे पिस्तूल विक्रीच्या काही प्रकरणांमध्ये मोठ्या किमतीची देवाणघेवाण होत असल्याचेही तपासात आढळून आले आहे.
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली असली, तरी केवळ पिस्तूल जप्त करण्याबरोबरच या शस्त्रांचा पुरवठा करणारे नेटवर्क आणि त्यामागील साखळीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.
एक पिस्तूल जप्त झाल्यानंतर त्यामागे आणखी शस्त्रे बाजारात येण्याचा धोका कायम राहतो. त्यामुळे अवैध शस्त्रांची निर्मिती, विक्री आणि पुरवठा करणाऱ्या संपूर्ण नेटवर्कवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध शस्त्रांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांसमोर आता केवळ शस्त्र जप्त करण्याचे नव्हे, तर त्यामागचे संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचे मोठे आव्हान आहे.





