जादा नफ्याच्या आमिषाला भुलला अन् लाखो रुपये गमावले
पुण्यात आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला जादा नफ्याचे आमिष दाखवून तब्बल ४४ लाख ७८ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
फिर्यादी प्रवीण दासरी, रा. न्यू सुनील नगर, सोलापूर, हे पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत असून त्यांचे वार्षिक पॅकेज सुमारे २७ ते २८ लाख रुपये आहे.
दासरी हे सोशल मीडियावर शेअर मार्केटचे व्हिडिओ पाहत होते. ऑगस्टमध्ये त्यांच्या मोबाईलवर शेअर मार्केटशी संबंधित लिंक आली. लिंक उघडल्यानंतर त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले.
या ग्रुपमध्ये मोठा नफा मिळाल्याचे मेसेज आणि विविध गुंतवणूक योजनांची माहिती दाखवण्यात आली. सुरुवातीला दासरी यांनी काही रक्कम गुंतवली आणि त्यातून ४ हजार रुपये विड्रॉल करूनही मिळाले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला.
यानंतर त्यांनी हळूहळू मोठी गुंतवणूक केली. १६ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरदरम्यान त्यांनी ४४ लाख ७८ हजार रुपये गुंतवले. त्यांना नफा आणि गुंतवलेली रक्कम मिळून तब्बल २ कोटी २० लाख रुपये मिळणार असल्याचे मेसेज देण्यात आले.
मात्र ५० लाख रुपये काढण्याची विनंती केल्यानंतर पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचा संशय आला.
या प्रकरणी सोलापूर शहर सायबर पोलिसांत रुचिका विशॉ नामक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनी तक्रारदाराला सुरुवातीला १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करण्याचा सल्ला दिला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





