मित्राच्या खुनाचा बदला? हल्ल्याआधीच कट उधळला!
हडपसर परिसरात मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आणखी एका तरुणावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-६ने कारवाई करत निहाल मुस्तफा सय्यद, वय २० वर्षे, याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तीन धारदार कोयते जप्त केले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून निहालचा मित्र सनी हिवाळे याचा खून झाला होता. या खुनाचा बदला घेण्यासाठी विरोधी गटातील सचिन नवले याच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
हल्ल्यासाठी आणलेले तीन कोयते निहालने लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर साईविहार कॉलनी परिसरात सापळा रचून पोलिसांनी निहालला ताब्यात घेतले.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला होण्यापूर्वीच पोलिसांनी हा कट उधळून लावल्याचा दावा केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





