पोलीस हवालदाराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

Rokhthok Maharashtra 4 0

नवी मुंबईत चक्क पोलीस दांपत्याचंच घर चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे.
सीबीडी-बेलापूरच्या आग्रोळी गावातील सेक्टर 29 येथील शिवम अपार्टमेंटमध्ये ही चोरी झाली.
या घरात राहणारे 45 वर्षीय प्रमोद शिरके हे नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांची पत्नी मुंबई पोलिसात हवालदार आहेत.
21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हे पती पत्नी ड्युटीवर गेले. त्यानंतर सकाळी साडेनऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य आणि आतील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी बेडरूममधील कपाट फोडून सुमारे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, हार आणि मंगळसूत्र, तसेच 25 हजार रोख रुपयांचा ऐवज लंपास केला.
कामावरून घरी परतल्यानंतर प्रमोद शिरके यांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी तात्काळ सीबीडी-बेलापूर पोलिसांना माहिती दिली.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.