मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली! गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत ४ भाविकांना उडवलं
मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा अपघात!
प्रभादेवी परिसरात विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसल्याने चार भाविक जखमी झाले आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी ‘KG मार्गचा राजा’च्या विसर्जन मिरवणुकीत ही धक्कादायक घटना घडली. इंद्रा टॉवर, काकासाहेब गाडगीळ मार्ग परिसरात मिरवणूक सुरू असताना एक होंडा सिटी कार थेट मिरवणुकीत घुसली.
या कारने गणपतीची ट्रॉली आणि मिरवणुकीतील चार भाविकांना धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांना KEM रुग्णालयात, तर दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार आणि चालक प्रणव राकेश अग्रवाल, वय २१, याला ताब्यात घेतले. चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दरम्यान, कारचालकाने भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप गणेशभक्तांनी केला असून, कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेचा घटनास्थळावरील व्हिडिओ सध्या समोर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





