पुण्यात मोकळ्या जागेत कचरा आढळल्यास 5 लाखांचा दंड! आयुक्तांचा कठोर आदेश

Rokhthok Maharashtra 5 0

पुण्यात आता मोकळ्या जागांवर कचरा टाकणं आणि जागा अस्वच्छ ठेवणं महागात पडणार आहे… कारण महापालिका आयुक्तांनी थेट पाच लाख रुपयांच्या दंडाचा इशारा दिला आहे!
पुणे शहरातील खासगी किंवा सरकारी मोकळ्या जागांवर कचरा अथवा राडारोडा आढळल्यास संबंधित जागामालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जागा मालकांनी आपल्या जागेभोवती निळे किंवा हिरवे पत्रे, ग्रीन नेट लावून जागा संरक्षित करणं आवश्यक असल्याचं आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं आहे.
यासाठी संबंधित जागामालकांना १५ दिवसांची नोटीस दिली जाणार असून, मुदतीत स्वच्छता न केल्यास थेट दंड आकारला जाणार आहे. हा दंड जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत असू शकतो.
महापालिकेच्या आरक्षित जागा, ॲमेनिटी स्पेस आणि सरकारी मोकळ्या जागांनाही हा नियम लागू होणार आहे.
शहरात कचऱ्याचे ढीग आणि राडारोड्याची समस्या रोखण्यासाठी प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे.
आता पुण्यात मोकळी जागा असली, तरी तिची स्वच्छता राखण्याची जबाबदारी मालकाला पार पाडावी लागणार… अन्यथा पाच लाखांचा दंड भरावा लागणार!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.