घनकचरा निविदेला नगरसेवकांचा आक्षेप; प्रक्रिया स्थगित प्रशांत भाडळे यांच्या निवेदनानंतर पुनर्निविदेची मागणी
फुरसुंगी : फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदेतील काही अटी-शर्तींवर नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान निविदा प्रक्रिया स्थगित करून आवश्यक बदलांसह पुनर्निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगरपरिषदेने १२ सप्टेंबर २०२६ रोजी यांत्रिकी पद्धतीने रस्ते स्वच्छता, घराघरातून वर्गीकृत कचरा संकलन आणि कचऱ्याची प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, अटी-शर्तींबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व गटनेता यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली.
यानंतर गटनेता प्रशांत भाडळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत निविदा स्थगित करून नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने पुनर्निविदा काढण्याची मागणी केली.
“निविदेतील अटी-शर्तींबाबत कोणताही संभ्रम राहता कामा नये. नागरिकांना दर्जेदार स्वच्छता सेवा मिळणे ही प्राथमिकता असून सर्व बाबी स्पष्ट करून पारदर्शक पद्धतीने पुनर्निविदा काढावी,” अशी भूमिका भाडळे यांनी मांडली.

दरम्यान, निविदा प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असून हा विषय आगामी मुख्य सभेत मांडण्यात येणार आहे. सभासदांच्या शंकांचे निरसन करून आवश्यक सुधारणा केल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार पुनर्निविदा काढण्यात येणार आहे.
स्वच्छता कामे थांबविणे हा उद्देश नसून निविदा प्रक्रिया अधिक स्पष्ट, नियमबद्ध व पारदर्शक करण्यासाठी स्थगिती देण्यात आल्याचे नगरपरिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रोखठोक न्युज फुरसुंगी प्रतिनिधी :- गणेश भागीवंत





