उंड्रीतील धोकादायक चेंबरची अखेर दुरुस्ती नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेची तातडीची कार्यवाही; सुभाष घुले यांनी मानले आभार

Rokhthok Maharashtra 15 0

उंड्री येथील मुख्य रस्त्यावर विकास कदम यांच्या घरासमोरील तसेच शाहू बँकेसमोरील धोकादायक अवस्थेतील चेंबरची अखेर पुणे महापालिकेकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. चेंबर तुटलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. गणेशोत्सवाच्या काळात या रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला होता.

विकास कदम यांच्या घरासमोरील चेंबर पूर्णपणे तुटले होते, तर शाहू बँकेसमोरील चेंबरची अवस्था अत्यंत खराब झाली होती. या चेंबरवर केवळ तारा शिल्लक राहिल्याने पादचारी तसेच वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला होता. या धोकादायक चेंबरमुळे काही दिवसांपूर्वी अपघातही घडला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात होती.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पांडुरंग घुले यांनी पुणे महापालिका प्रशासनाकडे चेंबरची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावर वाढणारी गर्दी लक्षात घेता संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन्ही चेंबरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे.

दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण केल्याबद्दल सुभाष पांडुरंग घुले यांनी पुणे महापालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांचे आभार मानले. मात्र, शहरातील इतर धोकादायक चेंबरचीही नियमित पाहणी करून त्यांची वेळेत दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

रोखठोक न्युज फुरसुंगी प्रतिनिधी :- गणेश भागीवंत

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.