उंड्रीत आयटी इंजिनिअर विवाहितेचे टोकाचे पाऊल!
पुण्यातील उंड्री परिसरात अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या वैष्णवी जऱ्हांडे, वय २३, या आयटी इंजिनिअर विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. वैष्णवी या बंगळुरूमधील एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या आई-वडिलांनी लग्नासाठी तब्बल ४५ लाख रुपये खर्च केल्यासोबतच १० तोळे सोने दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून नवीन कार घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि वैष्णवीचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.
धक्कादायक म्हणजे, वैष्णवी गर्भवती असल्याचेही कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. घटनेच्या आदल्या रात्री वैष्णवीच्या पतीने तिच्या पालकांना फोन करून ‘तुमच्या मुलीला इथून घरी घेऊन जा’, असे सांगितल्याचा आरोप आहे.
यानंतर काही तासांतच वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी पती आणि सासरच्या मंडळींविरोधातील आरोपांची चौकशी होणे महत्त्वाचे असून, पोलिस तपासातून नेमके कारण स्पष्ट होणार आहे.





