ससाणेनगर विसर्जन घाटावर महिला पोलिसावर नारळ फेकला!

Rokhthok Maharashtra 12 0

पुण्यातील हडपसरच्या ससाणेनगर विसर्जन घाटावर महिला पोलिसाच्या तोंडावर नारळ फेकून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत महिला पोलीस अंमलदाराचा एक दात पडला असून, आणखी दोन दात हलल्याने त्यांना दुखापत झाली आहे.
ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. महिला पोलीस अंमलदार ससाणेनगर येथील विसर्जन घाटावर गर्दी नियंत्रणाचे कर्तव्य बजावत होत्या.यावेळी विसर्जन हौदातून गणेशमूर्ती काढण्यावरून वाद झाला. त्यानंतर जितेनसिंग जितेंद्रसिंग टाक, चिंटूसिंग जितेंद्रसिंग टाक आणि राजवीर दारासिंग भोड, या तिघांनी विसर्जनासाठी जमलेल्या नागरिकांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे.
याचदरम्यान फेकलेला नारळ महिला पोलीस अंमलदार यांच्या तोंडावर लागला. त्यात त्यांचा समोरील एक दात पडला, तर खालील दोन समोरील दात हलल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.या प्रकरणी ३८ वर्षीय महिला पोलीस अंमलदारांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.