अमरावती ‘डफरीन’ अग्निकांडाचं CCTV समोर! अलार्म वाजला, दिवे चमकले; तरी परिचारिका झोपेत?

Rokhthok Maharashtra 15 0

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात झालेल्या अग्निकांडाचे धक्कादायक CCTV फुटेज समोर आले आहे.
२४ ऑगस्ट रोजी पहाटे एनआयसीयूमधील व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.
माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत हे CCTV फुटेज दाखवत रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
फुटेजनुसार, आग लागण्यापूर्वी तीन वेळा धोक्याचा अलार्म वाजला आणि लाल दिवे चमकले. मात्र, ड्युटीवर असलेल्या परिचारिका आणि कक्षसेविका एनआयसीयूमध्ये नसून बाहेरील लॉबीत झोपलेल्या दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्फोटाचा मोठा आवाज झाल्यानंतर कर्मचारी जागे झाले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विशेष म्हणजे, सरकारी अहवालात परिचारिका त्यावेळी एका बालकाला फीडिंग करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, CCTV फुटेजमुळे या अहवालावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हा अहवाल दोषींना आणि कंत्राटदारांना वाचवण्यासाठी ‘स्क्रिप्टेड’ असल्याचा आरोप डॉ. देशमुख यांनी केला आहे.
आता या CCTV फुटेजनंतर प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.