फुरसुंगीत एटीएम फोडण्याचा सलग दोनदा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई; हातोडी, हातमोजे व मास्क जप्त
रोखठोक न्युज फुरसुंगी प्रतिनिधी (गणेश भागीवंत): फुरसुंगी गावातील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा सलग दोनदा प्रयत्न करणाऱ्या शातीर आरोपीला फुरसुंगी पोलिसांच्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिताफीने ताब्यात घेतले. निवृत्ती (अतुल) बाळासो सरोदे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हातोडी, हातमोजे आणि मास्क जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एटीएम फोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
२५ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ३ वाजता फुरसुंगी गावातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कमांड सेंटर, मुंबई येथून पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एटीएम मशीनचा कॉस्मेटिक दरवाजा, प्रेझेंटर, शटर असेम्ब्ली, एस अँड जी लॉक आदींची तोडफोड झाल्याचे आढळून आले.
पोलिसांनी कमांड सेंटरमधून सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याची पाहणी केली. त्यामध्ये मध्यम बांध्याचा, अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील व्यक्ती केसरी रंगाचे हातमोजे, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट व चेहऱ्यावर काळा मास्क घालून हातोडीच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४३२/२०२६, भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम ६२, ३०५, ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला असता तपासादरम्यान पोलिसांना संशयित व्यक्ती फुरसुंगी येथील महादेव सायकल अँड गॅरेज या दुकानाकडे जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित दुकानात असताना त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव निवृत्ती (अतुल) बाळासो सरोदे असल्याचे सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने सदर एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. तसेच यापूर्वीही याच एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.
___________

पोलिस पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलिस उपायुक्त जीवन बेनीवाल, परिमंडळ-6, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. तपास पथकाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक विनोद पवार, पोलिस हवालदार नितीन गायकवाड, पोलिस अंमलदार सागर वणवे, श्रीनाथ जाधव, आनंद पाटोळे, हेमंत कामथे, अभिजीत टिळेकर, नितीन सोनवणे व गणेश शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
___________





