राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या बदनामी खटल्याची सुनावणी लांबणीवर नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे आणि महात्मा गांधी हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उलट तपासात महत्त्वाचे मुद्दे
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी बदनामी खटल्याची आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
विशेष एमपी-एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश श्री. अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर हा खटला सुरू असून, राहुल गांधी यांच्या वतीने अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार हे फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा उलट तपास घेत आहेत. फिर्यादीच्या वतीने अॅड. संग्राम कोलटकर हे काम पाहत आहेत.
मागील सुनावणीदरम्यान झालेल्या उलट तपासात महात्मा गांधी यांच्या हत्येची पार्श्वभूमी, नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांची भूमिका, तसेच गोपाळ गोडसे आणि त्यांच्या पत्नी सिंधू गोडसे यांच्या मुलाखतींच्या संदर्भात विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले.
अॅड. मिलिंद पवार यांच्या म्हणण्यानुसार, उलट तपासादरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी गोपाळ गोडसे यांच्या तीन मुलाखतींचे व्हिडिओ मान्य केले असून, ते व्हिडिओ त्यांचे आजोबा गोपाळ गोडसे यांच्या मुलाखतींचे असल्याचेही मान्य केले आहे.
या मुलाखतींच्या संदर्भात उलट तपासात महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत गोपाळ गोडसे यांनी केलेल्या कथित वक्तव्यांचा उल्लेख करण्यात आला. तसेच सिंधू गोडसे यांच्या मुलाखतीतील कथित वक्तव्यांचाही संदर्भ घेण्यात आला. या वक्तव्यांमध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येपूर्वी त्या घटनेची माहिती असल्याचा दावा आणि त्यासंदर्भातील त्यांची भूमिका व्यक्त झाल्याचे बचाव पक्षाकडून नमूद करण्यात आले.
तसेच नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अथवा सक्रिय कार्यकर्ते होते का, यासंदर्भातही फिर्यादीकडून उत्तरे नोंदवून घेण्यात आली. महात्मा गांधी यांच्या हत्येची घटना, नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांची भूमिका, त्यांचे संबंधित संघटनांशी असलेले संबंध आणि गोपाळ गोडसे यांच्या नंतरच्या मुलाखती यांचा परस्पर संदर्भ तपासण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या उलट तपासातून करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर फिर्यादीचा पुढील उलट तपास होणे अपेक्षित होते. मात्र, मा. न्यायाधीश श्री. अमोल शिंदे हे आज न्यायालयीन कामकाजासाठी उपलब्ध नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही.
या प्रकरणात अॅड. ज्ञानेश्वरी जाधव व अॅड. कैलास जिरे हे बचाव पक्षाला सहाय्य करीत आहेत.
पुढील सुनावणी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.





