उंब्रजमध्ये रस्त्यावरून वाद! ६ प्लॉटधारकांचा रस्ता अडवला? प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

Rokhthok Maharashtra 15 0

उंब्रजमध्ये रस्त्याचा वाद चिघळला असून, रस्त्याच्या वापरावरून धमकी आणि अडथळे निर्माण केल्याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
उंब्रज परिसरातील गट क्रमांक २४/५ मधील एकूण ६ प्लॉटधारकांच्या ये-जा करण्याच्या रस्त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी प्लॉटधारकांनी कराडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित जागेवर अनेक प्लॉटधारकांनी घरे बांधली असून, त्यांच्या ये-जा करण्यासाठी हा रस्ता आवश्यक आहे. मात्र, रस्त्याच्या वापरावरून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
तसेच, रस्त्याच्या वापरासंदर्भातील वाद न्यायालयात सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच रस्त्यावरून ये-जा करताना अर्जदारांच्या मुलांना धमकी देण्यात आल्याचा, तसेच मुलाला मारहाणीची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
संबंधित जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये रस्त्याची नोंद असल्याचा दावा प्लॉटधारकांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्ष रस्त्याचा वापर करताना अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयाकडून उंब्रज पोलिसांना प्रकरणाची सविस्तर पाहणी करून तक्रारीतील मागण्यांनुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अडवलेला रस्ता प्रशासनाच्या उपस्थितीत खुला करून द्यावा, अशी मागणी प्लॉटधारकांनी केली आहे.
आता या प्रकरणात प्रशासन आणि पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे उंब्रजमधील प्लॉटधारकांचे लक्ष लागले आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.