लातूर-कल्याण महामार्गाऐवजी कल्याण-नगर रेल्वेमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करावे – खासदार डॉ. अमोल कोल्हे

Rokhthok Maharashtra 11 0

नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विरोधाची दखल घेऊन प्रस्तावित लातूर-कल्याण जनकल्याण महामार्गाच्या आरेखनाचा फेरविचार करावा. त्याऐवजी कल्याण-नगर रेल्वेमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

रोहोकडी ते तळेरान दरम्यानच्या गावातील ग्रामस्थांची उपजीविका पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे लातूर-कल्याण जनकल्याण महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे उपजिविकेचे प्रमुख साधन असलेली शेती बाधित होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी या महामार्गास तीव्र विरोध केला आहे.

शेतकऱ्यांच्या या विरोधाची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून जनकल्याण महामार्गाच्या आरेखनाचे फेरसर्व्हेक्षण करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर या महामार्गाऐवजी कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची आणि नगर-कल्याण रेल्वेमार्गाचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

 

रस्ते विकासाबरोबरच ग्रामस्थांचे, शेतकऱ्यांचे हित जपण्याची गरज असून शेतीवर उपजीविका अवलंबून असल्याने त्यांच्या उपजिविकेचे साधन असलेल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण व रेल्वेमार्ग विकसित करुन समतोल साधण्याची गरज खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.