कोरोनाचा फायदा घेत बायकोसोबत 3 मर्डर! ‘ती’ एक चूक अन् 4 वर्षांनी भयंकर हत्याकांडाचा उलगडा
कोरोनाचा फायदा घेत बायकोसोबत तीन हत्या; चार वर्षांनी धक्कादायक उलगडा!
गुजरातच्या कोसंबा येथील तब्बल चार वर्षांपूर्वीच्या हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा झाला आहे.
पोलिसांच्या तपासात एका वृद्धेसह तब्बल तीन महिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही महिला एकमेकींच्या जवळच्या नातेवाईक होत्या.
पोलिसांच्या माहितीनुसार, माधवदास आणि त्याची पत्नी उर्मिला यांनी 70 वर्षीय शांताबेन वसावा यांची उशीने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर कोरोनाच्या काळातील परिस्थितीचा फायदा घेत त्यांच्या अंत्यसंस्काराची खोटी अफवा पसरवण्यात आली.
मृतदेह एका ड्रममध्ये ठेवून त्यात सिमेंट आणि पाणी भरण्यात आले. तीन महिन्यांनंतर हा ड्रम घराच्या अंगणात सुमारे चार ते पाच फूट खोल खड्डा खोदून पुरण्यात आला आणि त्यावर सिमेंटचा स्लॅब टाकण्यात आला.
धक्कादायक म्हणजे, कौटुंबिक वादातून माधवदासनेच पोलिसांकडे पत्नीला अडकवण्यासाठी तक्रार केली. मात्र, तपासादरम्यान त्याच्या तक्रारीवरच पोलिसांना संशय आला आणि संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.
चौकशीत दाम्पत्याने आणखी दोन महिलांच्या हत्येची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मृतदेहांचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.





