लोककल्याण नवरात्र महोत्सवात कार्यक्रमांची मांदियाळी! ए. एल. नरसिंगराव यांना १९ ऑक्टोबरला ‘लोककल्याण भूषण’ पुरस्कार; विजयादशमीला चार विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप
फुरसुंगी : तुकाई दर्शन, फुरसुंगी येथे लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोककल्याण नवरात्र महोत्सवात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला सन २०२६ चा २४ वा ‘लोककल्याण भूषण’ पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ए. एल. नरसिंगराव यांना १९ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे. यासोबतच रक्तदान शिबिर, बालमेळावा, संगीत कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
संत साहित्याचे गाढे अभ्यासक, इतिहास संशोधक, मराठी लेखक आणि कवी डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते ए. एल. नरसिंगराव यांना ‘लोककल्याण भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोककल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. हा सोहळा सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता तुकाई दर्शन, फुरसुंगी, हडपसर येथे पार पडणार आहे.
विविध कार्यक्रमांनी महोत्सवात रंगत
महोत्सवांतर्गत मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी बालमेळावा आयोजित करण्यात येणार असून, गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी कला परिवार हडपसरच्या वतीने दिलीप मोरे प्रस्तुत कराओके कार्यक्रम सादर होईल.
शुक्रवार, १६ आणि शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी पोपट ढमाळ यांचे ‘नाथांचे सांप्रदायिक बहुरंगी भारूड’ सादर होणार आहे. तर सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी लखन कसबे दिग्दर्शित गायत्री म्युझिकल ऑर्केस्ट्राचा संगीत कार्यक्रम रसिकांचे मनोरंजन करणार आहे.
विजयादशमीला चार विद्यार्थ्यांना सायकलींची भेट
महोत्सवाच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांतर्गत मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त ‘लोककल्याण भाग्यवंत विद्यार्थी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉद्वारे चार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लागणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प
लोककल्याण नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरांचे जतन करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक कलांचे संवर्धन आणि शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम यांच्या माध्यमातून महोत्सवाला सामाजिक आशय प्राप्त झाला आहे.
लोककल्याण प्रतिष्ठानच्या या उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार असून, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यालाही प्रोत्साहन मिळणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी दिली.
मायमराठी वृत्तपत्र प्रतिनिधी – गणेश भागीवंत





