किनगाव पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू! अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात होता ताब्यात; नातेवाईकांचे गंभीर आरोप!
पोलीस ठाण्यातच २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू! अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात होता पोलिसांच्या ताब्यात; नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप!
लातूर जिल्ह्यातील किनगाव पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या २१ वर्षीय अमित चव्हाण याचा पोलीस ठाण्यातच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमितचे हाडोळती परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. २० नोव्हेंबर रोजी तो मुलीला घेऊन गेला होता. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी दोघांना अहिल्यानगर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले होते.
सोमवारी पहाटे मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्याचदरम्यान पोलीस ठाण्यात असलेल्या अमितचा पहाटे चार ते पाचच्या सुमारास मृत्यू झाल्याचे समोर आले.
या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलिसांवर छळाचे गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करण्यात येणार असून, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी होणार आहे.
अखेर पोलीस कोठडीत असलेल्या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर आता सीआयडी तपासातूनच समोर येणार आहे.





