गोपाळ गोडसे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना चोरांबरोबर केली; यावर मला काही भाष्य करायचे नाही- सात्त्यकी सावरकर

Rokhthok Maharashtra 21 0

 

पुणे- पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश श्री. अमोल श्रीराम शिंदे यांच्या समोर लोकसभेचे विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित बदनामीप्रकरणी फौजदारी खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यातील फिर्यादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पंतू सात्त्यकी सावरकर यांचा उलटतपास राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी घेतला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना “तात्या” या टोपणनावाने ओळखले जात असे. या खटल्यामध्ये सावरकरांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध घटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सावरकरांच्या लिखाणातून त्यांचे सामाजिक व राजकीय विचार समजून घेता येतात. तसेच, सावरकरांची विचारसरणी समजून घेण्यासाठी त्यांचे स्वतःचे लिखाण महत्त्वाचे आहे. “हिंदुत्व” हा सावरकरांच्या विचारसरणीचा महत्त्वाचा भाग आहे, ही बाब आजच्या उलटतपासणीत सात्यकी सावरकर यांनी मान्य केली.

तसेच, सावरकरांच्या लिखाणातून हिंदू आणि मुस्लिम समाजाशी संबंधित राजकीय प्रश्नांवर चर्चा करण्यात आल्याचे आढळते. सावरकरांनी “हिंदू राष्ट्र” आणि “हिंदुत्व” या विषयांवर लेखन केलेले आहे. त्यामुळे सावरकरांच्या मुस्लिम समाजाशी संबंधित विचारांचा अभ्यास त्यांच्या स्वतःच्या लिखाणातून करता येतो, ही बाबही उलटतपासणीत समोर आली.

तसेच, सात्त्यकी सावरकर यांचे आजोबा गोपाळ गोडसे यांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देत ॲड. मिलिंद पवार यांनी प्रश्न विचारला की, गोपाळ गोडसे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना चोरांबरोबर केली होती; याबाबत तुमचे काय मत आहे? यावर सात्त्यकी सावरकर यांनी, “यावर मला काही भाष्य करायचे नाही,” असे उत्तर दिले.

गोपाळ गोडसे यांच्या मुलाखतीतील कथित मुस्लिमविरोधी विचारांच्या समर्थनाबाबतही ॲड. पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच, त्याच मुलाखतीमध्ये गोपाळ गोडसे आणि सिंधू गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत पश्चात्ताप न करता आनंद व्यक्त केला होता, याबाबत तुम्हाला काय सांगायचे आहे, असा प्रश्न सात्त्यकी सावरकर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “यावर मला काहीही मत व्यक्त करायचे नाही,” असे उत्तर दिले. दरम्यान फिर्यादी यांचे वकील अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर यांनी या प्रश्नावर हरकत घेतली.

अशा विविध प्रश्नांवरील उलटतपासणीनंतरही न्यायालयीन कामकाज सुरू होते. परंतू न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यावर आजच्या दिवसापुरता सात्त्यकी सावरकर यांचा उलटतपास पूर्ण झाला. पुढील सुनावणी गुरुवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.

या खटल्यात राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. पवार यांना ॲड. ज्ञानेश्वरी जाधव, ॲड. अनुष्का डोके, ॲड. सायली कांबळे आणि ॲड. निलेश प्रजापती हे सहकार्य करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.