उंब्रजजवळ भीषण अपघात! रोड रोलरखाली सापडून ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू.

Rokhthok Maharashtra 11 0

कराड-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रजजवळ सर्व्हिस रोडच्या कामादरम्यान भीषण अपघात झाला आहे. रोड रोलरखाली सापडल्याने सुनील नारायण गद्रे, वय ४५, रा. सातारा रोड, यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील गद्रे हे उंब्रज येथील गणेश धाब्याकडून सर्व्हिस रोडने उंब्रजच्या दिशेने पायी जात होते. त्याचवेळी महामार्गालगत सर्व्हिस रोडच्या डांबरीकरण आणि सपाटीकरणाचे काम सुरू होते.
कामादरम्यान रोड रोलर मागे घेत असताना सुनील गद्रे हे त्याच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.दरम्यान, रस्त्याचे काम सुरू असताना पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या होत्या का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.