माढ्यात आचारसंहिता भंगाचा आरोप! भेंडमध्ये रस्त्याचे काम सुरू; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Rokhthok Maharashtra 7 0

माढ्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप! भेंडमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरूच; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश!
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भेंड गावात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते निलेशकुमार घुगे यांनी ९ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीसोबत ८ ऑक्टोबर रोजी काढलेले GPS लोकेशनसह फोटोही सादर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये काँक्रीट मिक्सर, वाळू-खडीचे ढीग आणि सुरू असलेले रस्त्याचे काम दिसत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
या तक्रारीची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी माढ्याच्या तहसीलदारांना सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
मात्र, संबंधित कामाला आधीच मंजुरी होती का, आचारसंहितेपूर्वी काम सुरू झाले होते का आणि प्रत्यक्षात नियमभंग झाला आहे का, हे चौकशीत स्पष्ट होणार आहे.
आता प्रशासनाच्या चौकशीत काय निष्पन्न होणार? भेंडमधील रस्त्याच्या कामाबाबत कोणती कारवाई होणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.