चार नगरसेवक असताना दुर्लक्ष का? गाडीतळ दुर्घटनेनंतर महापालिकेविरोधात संताप
हडपसर गाडीतळ येथे निकृष्ट जाळीचा गंभीर प्रकार! दुचाकीसह पती-पत्नी कालव्यात पडले; पाच ते सहा लाखांचे सोने वाहून गेल्याची माहिती!
पुणे महानगरपालिकेच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. हडपसरमधील गाडीतळ येथील कालव्यावर बसवलेली जाळी तुटल्याने दुचाकीवरील पती-पत्नी थेट कालव्यात पडल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित शेडगे हे पत्नीसमवेत दुचाकीवरून घरी जात असताना कालव्यावरील तुटलेल्या जाळीमुळे त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दोघेही कालव्यात पडले. सुदैवाने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं. त्यांच्यावर नोबल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
मात्र, या दुर्घटनेत अंगावरील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती असून, सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुचाकी अद्याप कालव्यातच असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, स्थानिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता जाळी तुटलेली आणि कालव्यावरील रस्ता खचलेला असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
चार नगरसेवक असतानाही नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित करत माजी नगरसेवक विजय भाऊ देशमुख यांनी महापालिका प्रशासनाला इशारा दिला आहे. तातडीने दुरुस्ती न झाल्यास धरणे आंदोलन आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी गोपीनाथ पवार, सतीश जगताप, स्वप्निल काळे, कुणाल वाघ, महेश गायकवाड, सतीश गायकवाड, तात्या ननवरे, दादा साळुंके, संकेत काकडे, साहिल ओरसे, मयूर कुल, संतोष सुरवसे, रामदास शेडगे, विकी गालटे उपस्थित होते.
आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करणार का? की आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार?
नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची की प्रशासनाचा निष्काळजीपणा?





