इन्स्टाग्रामवर विवाहितेचे अश्लील फोटो! संभाजीनगरमध्ये सायबर गुन्ह्याची खळबळ.
इन्स्टाग्रामवर विवाहितेचे अश्लील फोटो पोस्ट करून बदनामी करण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगरमधून सायबर गुन्ह्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय विवाहितेचे फोटो वापरून इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करण्यात आले आणि त्यावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून तिची बदनामी केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गादिया विहार परिसरातील या विवाहितेच्या पतीला ४ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी इन्स्टाग्राम अकाउंटवरून मेसेज आणि फॉलो रिक्वेस्ट आली. प्रोफाइल तपासल्यानंतर त्यावर पत्नीचे फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आरोपीने संबंधित महिलेच्या पतीसह तिचा भाऊ आणि इतर नातेवाइकांनाही बदनामीकारक मजकूर पाठवल्याचा आरोप आहे. पतीने जाब विचारल्यानंतर आरोपीने शिवीगाळ आणि धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी अकाउंटचे युजरनेम बदलण्यात आल्याचेही सांगण्यात येते.
या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर यंत्रणेच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.
सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून एखाद्याची बदनामी करणे हा गंभीर प्रकार असून, अशा गुन्ह्यांबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





