दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 19 मागण्या! दरमहा 15 हजार रुपये मदतीची मागणी

Rokhthok Maharashtra 5 0

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी कराडमध्ये विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. शेतकऱ्यांची वीजबिल वसुली आणि कर्जवसुली थांबवा, तसेच दुष्काळग्रस्त कुटुंबांना पुढील सहा महिने दरमहा 15 हजार रुपये आर्थिक मदत द्या, अशा 19 मागण्यांचे निवेदन कराड तहसीलदारांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र दुष्काळ निवारण व निर्मूलन समिती, राज्यस्तरीय कृती समिती आणि ग्रामीण हक्क संघर्ष मंच तसेच शेकापच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले.
यामध्ये शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांना आर्थिक मदत, रोजगार हमीची कामे सुरू करणे, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी शेकापचे जिल्हाध्यक्ष ॲड. समीर देसाई, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, विद्याधर गायकवाड, संतोष बोलके, संतोष किरत, भागवत कांबळे आणि ज्येष्ठ नेते आनंदराव थोरात उपस्थित होते.
यावेळी ॲड. समीर देसाई यांनी वाड्या-वस्त्यांवरील जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. तसेच वीजबिल किंवा कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास दिल्यास शेतकरी कामगार पक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या निवेदनावर 15 दिवसांत कार्यवाही करून अहवाल द्यावा, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.