लग्नासाठी १०० फूट टॉवरवर चढला तरुण! पोलिसांची भन्नाट शक्कल

Rokhthok Maharashtra 8 0

लग्नासाठी होकार हवा म्हणून तरुण थेट १०० फूट उंच मोबाइल टॉवरवर! पोलिसांनी प्रेयसीला हातात पुष्पहार देऊन उभं केलं अन् अखेर तरुण सुखरूप खाली!
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमधील मामुर्डी परिसरात एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. प्रेयसीने लग्नाला होकार द्यावा, या मागणीसाठी एका २२ वर्षीय तरुणाने चक्क १०० फूट उंच मोबाइल टॉवरवर चढून गोंधळ घातला.
उबेदुल्ला शेख, वय २२, मूळ राहणार धुबरी, आसाम, असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी १ नोव्हेंबर रोजी प्रेयसीसोबत किरकोळ वाद झाल्यानंतर कथित मद्यधुंद अवस्थेत तो दुपारी साडेतीनच्या सुमारास मामुर्डी येथील गोदरेज टाउनशिपमधील व्होडाफोनच्या मोबाइल टॉवरवर चढला.
पोलिसांनी आणि नातेवाइकांनी वारंवार विनंती करूनही तो खाली उतरण्यास तयार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली. त्यांनी तरुणाच्या प्रेयसीला हातात पुष्पहार देऊन टॉवरखाली उभे केले. प्रेयसी लग्नासाठी तयार झाल्याचा समज होताच तरुण खाली येण्यास तयार झाला.
त्यानंतर अग्निशमन दलाने मोठ्या क्रेनच्या मदतीने सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्याला सुखरूप खाली उतरवले.
ही माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.