हडपसरमध्ये मद्यधुंद टेम्पोचालकाचा धुमाकूळ! ७ ते ८ बिअर पिऊन वाहनांना धडक
हडपसरमध्ये मद्यधुंद टेम्पोचालकाचा धुमाकूळ! ७ ते ८ बिअर पिऊन अनेक वाहनांना धडक; टेम्पो पलटी, लहान मुलगा जखमी!
पुण्यातील हडपसर-काळेपडळ परिसरात मद्यधुंद टेम्पोचालकाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोचालकाने तब्बल ७ ते ८ बिअर प्यायल्या होत्या. त्यानंतर मगरपट्टा आणि काळेपडळ परिसरात त्याने अनेक वाहनांना धडक दिली. या धडकेत एका वाहनाचे मोठे नुकसान झाले.
त्यानंतर प्रगती शाळेजवळील चौकात एका कारला धडक दिल्यानंतर टेम्पो थेट पलटी झाला. यावेळी कारमध्ये पाच वर्षांचा लहान मुलगा आणि आणखी एक मुलगा होता. या घटनेत लहान मुलाला किरकोळ खरचटले असून टेम्पो एका व्यक्तीच्या पायावर पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.
रात्री साडेसात ते साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली.
मात्र, विचार करा, हाच अपघात सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान झाला असता, तर शाळा सुटण्याच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असता.
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार कधी? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.





