शेतकरी आंदोलनाचा महामार्गाला फटका; मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूक वळवली!
शेतकरी आंदोलनाचा महामार्गाला फटका! मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक वळवली; पर्यायी मार्ग जाहीर!
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा आंदोलन तीव्र केलं आहे.
३ नोव्हेंबरपासून कोल्हापूरमधील किणी टोलनाका आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे आंदोलन सुरू असून, याचा परिणाम मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील वाहतुकीवर झाला आहे.
त्यामुळे महाराष्ट्र महामार्ग पोलीस, पुणे परिक्षेत्राकडून वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.
मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या वाहनांनी साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट, रहिमतपूर, पुसेसावळी, सांगली, अंकली आणि सांगली फाटा या मार्गाचा वापर करावा.
तर कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी याच मार्गाने उलट दिशेने प्रवास करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
आंदोलन सुरू असेपर्यंत वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांना नियमित अपडेट दिले जाणार आहेत.
त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासापूर्वी वाहतुकीची माहिती तपासावी आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे.





