पहूरच्या बंधाऱ्यातून दीड महिन्यापासून हजारो लिटर पाणी वाया!
पाणी वाचवण्याचे आदेश एका बाजूला आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया! पहूर येथील बेंबळा नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था समोर आली असून, गेल्या दीड महिन्यापासून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिकं सुकण्याची वेळ आली आहे.
पहूर गावाला उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये आणि शेतीला पाणी मिळावं, यासाठी बेंबळा नदीवर हा बंधारा बांधण्यात आला आहे.
मात्र, बंधाऱ्याला लावण्यात आलेली पत्रे गंजलेली, फुटलेली आणि छिद्र पडलेली असतानाही दुरुस्ती न करताच बसवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
परिणामी, गेल्या एक ते दीड महिन्यापासून हजारो लिटर पाणी वाया जात असून, बंधाऱ्यात पाणी साठत नसल्याने शेतीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.
संकेत ठाकरे यांनी पुढील महिन्यात गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
तर अनिल शेंडे, गोवर्धन शेंडे यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संकेत ठाकरे, आकाश खडसे, यश मारबडे आणि समस्त ग्रामस्थांनी तातडीने पाण्याची गळती थांबवण्याची मागणी केली आहे.
आता प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे!





