धागा तुटला अन् कैचीने हल्ला! भिवंडीतील जीन्स कारखान्यात रक्तरंजित राडा!
धागा तुटला अन् मैत्रीत पडली ठिणगी! मशीनचा धागा तुटल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांमध्ये असा वाद पेटला की, थेट कैचीने एकमेकांवर सपासप वार करण्यात आले. ही धक्कादायक घटना भिवंडीतील पोगाव परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीन्स कारखान्यात काम करणाऱ्या इमरान आणि रेहान यांच्यात मशीनचा धागा तुटल्यावरून वाद झाला. सुरुवातीला कारखान्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर दोघांनी कैचीने एकमेकांवर हल्ला केला.
कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली, मात्र वाद कारखान्याबाहेरही पोहोचला. इमरान आणि त्याच्या भावाने रेहानचा पाठलाग करून रस्त्यात त्याच्यावर कैचीने वार केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात दोन्ही बाजूंचे तरुण जखमी झाले असून, गंभीर जखमी रेहानला पुढील उपचारासाठी ठाण्यात हलवण्यात आलं आहे.
भिवंडी तालुका पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून परस्पर गुन्हे दाखल केले आहेत. सुहेल नामक आरोपी फरार असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.





