विद्यार्थ्यांना सायकलची गोडी लागावी, पर्यावरण व आरोग्याचे महत्त्व कळावे; लोककल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम! लोककल्याण भाग्यवंत विद्यार्थी सायकल योजनेतून विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
विद्यार्थिदशेतच सायकल चालवण्याची आवड निर्माण व्हावी, तसेच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी ‘लोककल्याण भाग्यवंत विद्यार्थी सायकल योजना’ राबविण्यात येते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सायकल चालवण्याची प्रेरणा मिळत असून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला जात आहे, असे प्रतिपादन लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी केले.
तुकाई दर्शन येथे आयोजित मोफत सायकल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी लकी ड्रॉद्वारे मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते.
यावर्षी संस्कृती काळभोर (इयत्ता दहावी, साधना इंग्लिश स्कूल) हिला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते, आनंद पाचागणे (इयत्ता नववी, साधना इंग्लिश स्कूल) याला उपाध्यक्ष दिलीप भामे यांच्या हस्ते, अवंतिका काळभोर (इयत्ता पाचवी, गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल) हिला सचिव इंद्रपाल हत्तरसंग यांच्या हस्ते, तर विहान बटले (इयत्ता सातवी, लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल) याला कोषाध्यक्ष पांडुरंग शेंडे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.
सायकल चालवण्याची विद्यार्थ्यांना शपथ
सायकल वाटपानंतर प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना आरोग्य संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी नियमित सायकल चालवण्याची शपथ देण्यात आली. या उपक्रमाला परिसरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली.
मायमराठी वृत्तपत्र प्रतिनिधी – गणेश भागीवंत





