*पुन्हा एकदा जिवंत होणार पन्हाळ्याची शौर्यगाथा* *रमणबाग युवा मंच आणि ‘गोष्ट इथे संपत नाही’ यांच्यातर्फे लाईट अँड साऊंड शोचे आयोजन ; ९ नोव्हेंबरला राज ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन*
पुणे, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील पन्हाळ्याच्या वेढ्याची, बाजीप्रभू आणि त्यांच्या तीनशे बांदल मावळ्यांनी गाजवलेल्या शौर्याची जाज्वल्य कथा लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जीवंत होणार आहे. रमणबाग युवा मंच व गोष्ट इथे संपत नाही यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सोमवार, दिनांक ९ नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होईल. १५ नोव्हेंबर पर्यंत हा शो पुणेकरांसाठी सायंकाळी ४ ते १० या वेळात विनामूल्य खुला असणार आहे.
गेल्या ४४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या रमणबाग युवा मंच ढोल-ताशा पथक आणि गोष्टींच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत स्वराज्याचा इतिहास पोहोचवणाऱ्या ‘गोष्ट इथे संपत नाही’ यांच्या तर्फे गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा किल्ले पन्हाळगडाची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या प्रतिकृतीसोबतच पुणेकरांना २० मिनीटांचा लाईट आणि साऊंड शो अनुभवता येणार आहे, ज्यामध्ये किल्ले पन्हाळगडाचा इतिहास, त्याचे ऐतिहासिक महत्त्व, किल्ल्यावरील महत्त्वाची ठिकाणे आणि पन्हाळगडाच्या वेढ्याशी संबंधित ऐतिहासिक घटनांचा आढावा घेतला जाणार आहे. सिद्दी जौहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका, पन्हाळगड ते विशाळगड हा प्रवास, बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांचे बलिदान तसेच ३०० बांदल मावळ्यांसह पावनखिंडीत बाजीप्रभूंनी केलेली प्राणांची शर्थ या सर्व घटना प्रकाश, ध्वनी आणि दृश्यांच्या माध्यमातून रसिकांसमोर जिवंत होतील.
‘इतिहासातील महत्त्वाच्या घटना गोष्टींच्या स्वरूपात इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘गोष्ट इथे संपत नाही’ या माध्यमातून केला जातो. याच उपक्रमाच्या साथीने गेल्या तीन वर्षांपासून आम्ही दिवाळीमध्ये स्वराज्यातील विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक घटना लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. भविष्याचा वेध गेत असताना आपल्या पिढीची इतिहासाशी असलेली नाळ तुटू नये, यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याचे सारंग मांडके व सारंग भोईरकर यांनी सांगितले.
रमणबाग युवा मंचचे अध्यक्ष शांतीसागर निपुणगे म्हणाले, ‘गेली ४४ वर्षे आम्ही ढोल-ताशाच्या माध्यमातून गणेशोत्सवात वादन करत आहोत. केवळ ढोल-ताशा वादन इतकाच उद्देश न ठेवता अशा उपक्रमांच्या माध्यमातून आजच्या युवा वर्गाला पुन्हा एकदा आपला इतिहास, संस्कृती याकडे आकर्षित करणे, आणि नव्या पिढीमध्ये त्याची आवड निर्माण करणे, यासाठी आम्ही हा उपक्रम करत आहोत.





