बीडमध्ये भरदिवसा महिलेचं अपहरण! घरात घुसून मुलांनाही मारहाण!
बीडमध्ये भरदिवसा थरार! घरात घुसून दोन चिमुकल्या मुलांना मारहाण केली, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि ३५ वर्षीय महिलेला थेट कारमध्ये कोंबून अपहरण केलं! या धक्कादायक घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
बीड शहरालगतच्या चऱ्हाटा फाटा परिसरात ही घटना घडली. दोन चारचाकी गाड्यांमधून आलेल्या चार आरोपींनी महिलेच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी महिला आणि तिच्या दोन लहान मुलांना मारहाण केली. त्यानंतर मुलांना जीवे मारण्याची धमकी देत महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेलं.
घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी वेगाने सूत्रं हलवत शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरातून अपहरण झालेल्या महिलेची आरोपींच्या तावडीतून सुखरूप सुटका केली.
मात्र, मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचं अपहरण नेमकं कोणत्या कारणातून करण्यात आलं, याचा पोलीस तपास करत आहेत.





