घराशेजारी झुडपात लपवलं पिस्तूल! पुणे पोलिसांनी आरोपीला पकडलं
घराशेजारील झुडपात पिस्तूल लपवलं अन् पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडलं! वडगाव शेरी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी बनावटीचं पिस्तूल बाळगणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
प्रथमेश उर्फ दाद्या धनंजय जाधव (वय २६, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथक क्रमांक दोनचे अधिकारी आणि कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई गणेश खरात आणि अनिल कुसाळकर यांना प्रथमेश जाधवकडे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान घराशेजारील झुडपात एका पिशवीत पिस्तूल लपवल्याचं समोर आलं. पोलिसांनी तिथून देशी बनावटीचं पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केलं.
परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, गणेश खरात, अनिल कुसाळकर, घावटे आणि वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आता हे पिस्तूल आरोपीला कुठून मिळालं आणि त्यामागे आणखी कोणाचं नेटवर्क आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.





