रात्री कीर्तन, सकाळी महाराजांचा मृतदेह! मोबाईल गायब असल्याने गूढ वाढलं
रात्री कीर्तन करून मठात परतले, मात्र सकाळी खोलीत आढळला महाराजांचा मृतदेह! भोकरदन तालुक्यातील या धक्कादायक घटनेमुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून महाराजांचा मोबाईल गायब असल्याने मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं आहे.
ह.भ.प. दौलत रामनाथ सातपुते महाराज (वय ४१), उर्फ महंत देवेंद्र चैतन्य स्वामी असं मृत महाराजांचं नाव आहे. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील रहिवासी होते. मागील आठ ते दहा वर्षांपासून ते भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात वास्तव्यास होते.
१४ नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचं कीर्तन झालं. त्यानंतर ते मठातील खोलीत झोपण्यासाठी गेले. मात्र, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाकडूनही तपासणी करण्यात आली.
शवविच्छेदन अहवालात मृत्यू गळफासामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, मोबाईल गायब असल्याने पोलिसांकडून सीडीआर तपासून शेवटच्या कॉलची माहिती घेतली जात आहे.
महाराजांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय? मोबाईल कुठे गेला? या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत.





