दौलतबाबा महाराजांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! ४० फूट अंतरावरील विहिरीत मोबाईल सापडला
दौलतबाबा महाराजांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट! मृत्यूच्या दिवसापासून गायब असलेला मोबाईल अखेर विहिरीत सापडला! आता मोबाईलमधून मृत्यूचं गूढ उलगडणार का?
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर संस्थानाचे मठाधिपती आणि प्रसिद्ध कीर्तनकार बालयोगी श्री देवेंद्र चैतन्य स्वामी उर्फ दौलतबाबा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.
स्वामींचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांचा मोबाईल फोन गायब असल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर पोलिसांनी घटनास्थळापासून अवघ्या ४० फूट अंतरावरील एका विहिरीतून हा मोबाईल शोधून काढला आहे.
विशेष म्हणजे, मोबाईलचं लोकेशन शोधल्यानंतर पोलिसांनी तब्बल चार विहिरींचं पाणी मोटारच्या साहाय्याने उपसलं आणि एका विहिरीतून मोबाईल हस्तगत केला. मात्र, पाण्यात पडल्यामुळे तो सध्या बंद अवस्थेत आहे.
आता सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईल सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच CDR तपासण्यात येणार आहे.
मृत्यूपूर्वी स्वामींना कोणाचे फोन आले होते? कोणाशी त्यांचा संपर्क झाला होता? मोबाईलमध्ये नेमके काय दडले आहे? या प्रश्नांची उत्तरं आता तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे दौलतबाबा महाराजांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे!





